भविष्य पाहता पाहता
खरच हे ज्योतिष शास्त्र शिकले आणि गेल्या १५ वर्षात माझे जीवन एकाहून एक अनुभवांनी समृद्ध झाले.चांगले आणि वाईट दोन्हीही. अगदी ४,५ दिवसापूर्वी ची गोष्ट. सकाळची गडबडीची कामे नुकतीच आटोपली होती .जरा टेकावे असा विचार करत असतनाच फोन आला .पलीकडून एक मुलगी बोलत होती ,"ताई तुम्ही भविष्य पाहता न. " "हो " मी उत्तरले ."ती म्हणाली ,"मला जॉब कधी मिळेल आणि राहायला जागा कधी मिळेल हो?"
राहायला जागा ? म्हणजे ? .तू राहतेस कुठे ग ? एवढे मी विचारल्यावर तिचा आवाज दाटून आला आणि फोनवरच ती रडू लागली .तिची कहाणी मला सांगू लागली .ताई , आता मी ७,८ महिन्यांच्या कैदेतूनच बाहेर पडलीय .माझे वर्षभरापूर्वी लग्न झाले ,प्रेम विवाह ......... पण माझा नवरा चांगला निघाला नाही .तो रोज दारू पिऊन मला मारत असे . माझ्या सासरच्या लोकांनी मला घरात डांबले होते .घरातील सर्व कामवाल्या कढून टाकल्या आणि माझ्याकडून कामे करून घेत असत .दिवसरात्र सासू सासरे मला टोचून बोलत आणि काल तर कहर झाला सासूने नवऱ्याला सांगितले हिच्या डोळ्यात तिखट टाक. फार मस्ती आहे हिच्या अंगात .पण मी कशीतरी माझ्या रूमची कधी लावून आत बसले .आणि आज हळूच कुणालाही न कळू देता थोडे फार कपडे आणि पैसे बरोबर घेऊन घरातून पळाले. आज मी ७, ८ महिन्यांनी ऊन पहात आहे .मला काही समजत नाही मी काय करावे. ?
"अग पण मग तुझ्या आई वडिलांना फोन कर ."
ताई मला वडील नाहीत .आईला अर्धांग वायू झालाय. माझ वय आता ३५ वर्ष आहे .एवढी वर्षे मी नोकरी केली आणि भावाचा संसार सांभाळला कारण तो जास्त शिकला नाही .त्याला नीट नोकरी पण मिळत नाही. म्हणून एवढी वर्ष पासे पुरवले त्याला .म्हणून मी जेव्हा लग्न केले तेव्हा त्याने मला खूप त्रास दिला आणि सांगितले तू आता माझ्या घरी पाऊल टाकू नको .आणि आता त्याला मी सांगितले फोन करून ,तेव्हा तो म्हणाला तू कुठेही जा ,मी तुला घरात घेणार नाही .आणि त्याने नवीन ठिकाणी घर बदलले त्याचा पत्ताही मला देत नाही .मी काय करू हो ताई ?
माझे ही डोळे ओलावले ."अग तू काही खाल्लस की नाही ? "
माझ्या या प्रश्नावर ती ओक्सा बोक्शी रडू लागली .कसे तरी तिला शांत केले .
ताई माझी मदत करा हो .,मी तिला म्हणले हे बघ ,तू थोडे काही तरी खावून घे .तुला २,३ ठिकाणाची माहिती सांगते तिथे राहण्याची व्यवस्था होऊ शकेल .मग मी तिला एका माहित असलेल्या मंदिराची माहिती दिली जिथे सेवा केल्यास रहायची व्यवस्था होते . मी तुला या नंबरवर थोड्या वेळाने फोन करते .माझ्या एवढ्या बोलण्यानेही तिला बरे वाटले .
तेवढ्यात माझ्या सासू बाईनी मला हाक मारली ,अग जेवायला घेऊ या का ? भूक लागली नाही का ? त्यांना होकार दिला .पानावर बसले त्यांच्या समाधानाकरिता ........पण घास घशाखाली उतरेना .ती कशी असेल ? ज्या मुलीला कोणताही आसरा नाही त्यांची काय अवस्था असेल ? ती काही जेवली असेल का? ............माझी तब्बेत ठीक वाटत नाही म्हणून मला जास्त जेवायचे नाही असे म्हणून मी कसे तरी ४ घास खाल्ले .पण ती डोक्यातून जाईना. मग पुन्हा काही वेळाने मी तिला फोन केला . ती म्हणाली ताई तुम्ही माझे भविष्य पहा ना .माझी जन्मतारीख ही आहे .असे सर्व सांगून म्हणाली .तुमची फी किती ? मी म्हणले अग तूझी नीट व्यवस्था झाली की सांग ,तीच माझी फी ............
मग काही वेळातच फोन करून तिला मी माझा सल्ला आणि भविष्यावरून भाकीत सांगितले.. तिच्या आयुष्यात खरो खर काही विवाहाचे सुख नव्हतेच .......पण तिला नोकरी मात्र चांगली लागणार होती .निदान हा तरी बरा भाग होता .
काय आहे माणसाची माणुसकी या जगात ........सख्या बहिणीला घरात ना घेणारी...........तिच्या पैशाचा उपयोग करून स्वतः मजा करणारी ............. स्वतःच्या सुनेच्या डोळ्यात तिखट टाकायला सांगणारी .............. या पेक्षा प्राणी बरे ..............क्षुद्र कीटक बरे .........सर्वच माणसे वाईट नसतात पण जेव्हा अशी माणसे पाहतो तेव्हा माणुसकीला काळिमा फासला जातो ...............